पुन्हा एकास सामना अग्रलेखातुन संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर तसेच केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाने शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. हाच मुद्दा घेऊन सामनाच्या अग्रलेखातूनराज्य सरकारवर ताशेरे ओढण्यात आले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अग्रलेखात म्हणाले की, दिल्लीदरबारी महाराष्ट्राचा पावलोपावली अपमान होत असताना अपमानित राज्य सरकारने महाराष्ट्राला राज्यगीत दिले आहे. देशाला ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आहे. तसे महाराष्ट्रासाठी स्वतंत्र असे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. एका बाजूला राज्यगीताची घोषणा झाली व दुसऱ्या बाजूला केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला.
त्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या नशिबी रिकामी खोकाच आला. मुंबईलाही भोपळाच मिळाला. या गीताचे जनक ज्येष्ठ कवी राजा बढे आहेत आणि ते गायले आहे शाहीर साबळे यांनी. त्यांच्या या महाराष्ट्र गीताने महाराष्ट्राला जाग आणण्याचे काम नेहमीच केले. महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, वैभव, शौर्य, राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक वारशांचा अभिमान या गीतांतील शब्दाशब्दात ठासून भरला आहे. महाराष्ट्राला राज्यगीत मिळाले, पण सध्या दिल्लीच्या तख्ताने महाराष्ट्राच्या सन्मानाचा, विकासाचा गळा घोटण्याचा जो चंग बांधला आहे त्याचे काय? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
“महाराष्ट्राचा अपमान झाला तरी चालेल, पण आम्ही मात्र लाचार बनून दिल्लीचे खूर चाटत राहू असे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे व त्यामुळेच की काय, या महाराष्ट्र गीतातील तिसरे कडवे गाळले असून महाराष्ट्राच्या नशिबी अर्धेअधुरे राज्यगीत आल्याचे बोलले जात आहे.दिल्लीचे तख्त मग ते कोणत्याही बाद–शहांचे असो, त्याने नेहमीच महाराष्ट्राशी वैर धरले. मोडेन पण वाकणार नाही हा मराठी माणसाचा बाणा त्यांना सलत राहिला. पण दिल्लीस मान्य नाही म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतातील तिसरे कडवे वगळून महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या चरणी अर्पण करणे कितपत योग्य आहे?याचा विचार करावा