साहेबराव बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रमात उज्ज्वल भारताचे कालचे, आजचे आणि उद्याचे स्वप्न या विषयावर अमोल मिटकरींनी व्याखान दिले. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कालचा भारत चांगला होता, आजचा भारत दूषित केल्याची खंत व्यक्त करत देशात रंग, जातीवरून राजकारण केले जात आहे.
मात्र यापलीकडेही देश आहे याचा विचार व्हायला हवा, असे म्हणत अमोल मिटकरींनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. यासोबतच कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरींनी जय श्रीराम म्हणल्यावर धडकी भरते, असे विधान केले. त्यांच्या या विधानावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, आंदोलनावेळी जय श्रीराम म्हटले जाते. मग रामाने दहशत शिकवली आहे का? रामाने सावत्रभाऊ असलेल्या भरतला नंदीग्रामची गादी दिली. मग ज्यांचे ‘जय श्रीराम’वर प्रेम असेल त्यांनी स्वतःच्या सख्ख्या भावाला दोन एकर शेती तरी द्यावी, असे विधान त्यांनी केले. याचबरोबर मिटकरी पुढे म्हणाले, रामाने भावाचा आदर केला, मग जय श्रीराम करणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. जसे वंदे मातरम् या नावाची दहशत तशीच जय श्रीरामच्या नावाची दहशत माजविण्याचे काम या सरकारमधील लोक करत आहेत, असा आरोप करत त्यांनी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना खडेबोल सुनावले.
दरम्यान, वंदे मातरम् बोलण्यावरून अमोल मिटकरींनी सुधीर मुनगंटीवार यांची भरकार्यक्रमात नक्कल केली आणि वंदे मातरम् म्हणण्याचा अट्टहास कशासाठी केला जातो, असा मुद्दादेखील उपस्थित केला. सुधीर मुनगंटीवार आणि किरीट सोमय्या यांनी ‘वंदे मातरम्’ हे शब्द स्पष्ट बोलून दाखवावे. त्यांना हसन मुश्रीफ हाच शब्द म्हणता येत नाही. वंदे मातरम् काय बोलणार, असेदेखील यावेळी अमोल मिटकरी म्हणाले.