२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच विरोधकांनी सुद्धा जोरदार मोदी सरकार विरोधात मोर्चबांधणी केली आहे . अशातच आता माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी देशाच्या राजकारणासंदर्भात एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
दिल्लीत नरेंद्र मोदी ज्या सिंहासनावर बसले आहेत ते सिंहासन हालल्याशिवाय राहणार नाही, असे तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे. मानहानी प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व गेले. यानंतर तेज प्रताप यांनी हे भाष्य केले आहे. सध्या राहुल गांधी प्रकरणात दिलेल्या शिक्षेवरून संपूर्ण देशाचे राजकारण तापलेले दिसून येत आहे.
पुढे तेज प्रताप म्हणाले, ‘2024 मध्ये आपला केंद्रातून सफाया होणार, हे भाजपला माहीत आहे. मी भविष्यवाणी करत आहे की, 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंहासन हालणार.’ ते पुढे म्हणाले, देशात भाजपने हुकूमशाहीचा पर्याय निवडला आहे. राहुल गांधी यांना ज्या पद्धतीने लोकसभेतून अपात्र घोषित करण्यात आले, ते अयोग्य आहे.
भाजप सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे लागला आहे. मात्र जनता त्यांना योग्यवेळी उत्तर देईल. भाजप आमच्या कुटुंबातील सदस्यांना कशा प्रकारे निशाणा बनवत आहे, हे लोक पाहत आहेत. ते विरोधकांच्या ऐक्याला घाबरतात, त्यामुळेच विरोधी नेत्यांना निशाणा बनवत आहेत, असेही तेज प्रताप म्हणाले.