अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त विध्नमौले नेहमीच चर्चेत असते अशातच आता ट्विटरवर सक्रीय झाल्यापासून पुन्हा एकदा परखडपणे आपली मतं मांडत आहे. नुकतंच तिने मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला लक्ष्य केलं आहे. कंगनाने आमिरला ‘बिचारा’ म्हणत आमीर खानची खिल्ली उडवली आहे. लेखिका शोभा डे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यानचा एक व्हिडीओ कंगनाने ट्विटरला पोस्ट केला आहे. या व्हिडीओत आमीर खान चित्रपटात शोभा डे यांची भूमिका कोणती अभिनेत्री निभावू शकते याचं उत्तर देत होता. यावरुनच कंगनाने आमीरवर टीका केली आहे.
शोभा डे यांच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यास कोणती अभिनेत्री त्यांची भूमिका चांगली निभावू शकते असं विचारण्यात आलं असता आमीर खानने दीपिका, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट यांची नावं घेत हीच तीन नाव डोक्यात येत असल्याचं म्हटलं. यावेळी शोभा डे यांनी आमीरला रोखलं आणि कंगनाची आठवण करुन दिली. माझी भूमिका निभावण्यासाठी गरज असलेला तो वेडेपणा कंगनाकडे असून ती चांगला न्याय देऊ शकते असं शोभा डे यांनी म्हटलं.
शोभा डे यांनी कंगनाचं नाव सुचवल्यानंतर आमीरनेही त्यावर सहमती दर्शवली. “हो नक्कीच, तीदेखील भूमिका चांगली निभावू शकते. कंगना एक चांगली आणि वैविध्यपूर्ण अभिनेत्री आहे,” असं आमीरने म्हटलं. दरम्यान शोभा डे यांनी यावेळी कंगनाचं थलैवी चित्रपटातील काम आपल्याला आवडलं असल्याचं नमूद केलं.आमीर खानने स्तुती केल्यानंतरही कंगना मात्र नाराजच झाली. आपलं नाव न घेण्याचा त्याने चांगला प्रयत्न केल्याचं कंगनाने म्हटलं. “मी एकटी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे हे त्याला माहीत नाही असे भासवण्याचा त्याने सर्वतोपरी प्रयत्न केला, त्याने ज्यांचा उल्लेख केला त्यापैकी एकीलाही पुरस्कार मिळालेला नाही”, असं ट्वीट कंगनाने केलं आहे.