Latest Marathi News

BREAKING NEWS

कोल्हापुरात पावसाची उघडीप, पंचगंगेची पाणी पातळी ३७ फूट ८ इंच

0

 

कोल्हापूर | गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या सतंतधार पावसाने आज, शुक्रवारी सकाळपासून उघडीप घेतली आहे. मात्र, ढग दाटून येताच अधून-मधून मोठ्या सरी कोसळत आहेत. आज, सकाळी पंचगंगेची पाणी पातळी ३७ फूट ८ इंचावर पोहचली होती. इशारा पातळीवर जाण्यासाठी केवळ दीड फूट शिल्लक असल्याने प्रशासन सतर्क राहून बाधित ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना देत आहे. एकूण ६४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

मागच्या काही दिवसांपासून कोल्हापुरात थांबून थांबून जोरदार सरी कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा इंचाने वाढत असल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मध्यरात्री पाणी पातळी इशारा पातळीवर पोहण्याची शक्यता आहे.

राधानगरी धरणात १५१.४३ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा : हातकणंगले : १४.६, शिरोळ : ८.८, पन्हाळा : ४३.४, शाहूवाडी : ४८.४, राधानगरी : ५१.१, गगनबावडा : ७७.७, करवीर : ३०.२, कागल : २६.३, गडहिंग्लज : १८.९, भुदरगड : ४८.३, आजरा : ३९, चंदगड : ७२.७.

Leave A Reply

Your email address will not be published.