पुणे |
स्नातकांना मिळालेली पदवी त्यांचे ज्ञानाप्रति समर्पण आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्य त्यांना आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचविण्यात उपयुक्त ठरेल. स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२२ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ.राजेश गोखले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.बैस म्हणाले, पदवी प्राप्त करणे हे अंतिम उद्दिष्ट नसून शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परीक्षेचे बदलते स्वरुप आणि नवे तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेऊन त्यादृष्टीने आपली तयारी करावी लागेल. पुणे माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल उद्योगाचे केंद्र आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल यासाठी विद्यापीठाने सातत्याने प्रकल्प राबविले पाहिजेत.
२१ व्या शतकाच्या गरजा लक्षात घेऊन चांगल्या विचारांच्या आधारे परिपूर्ण व्यक्तीमत्व घडविणे हा शिक्षणाचा गाभा आहे. प्रत्येकाने एक किंवा त्यापेक्षा जास्त विषयात सखोल अभ्यास करण्यासाठी सक्षम असावे. चारित्र्य, नैतिकता, घटनात्मक मूल्ये, बौद्धीक जिज्ञासा, वैज्ञानिकता, रचनात्मकता आणि सेवाभावनेच्या आधारे विज्ञान, समाजशास्त्र, कला, भाषा, तंत्रज्ञान यासह अन्य क्षेत्रातही संधी शोधण्याची क्षमता निर्माण करावी लागेल. उच्च शिक्षणाला उत्पादकतेकडे न्यावे लागेल. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करावी लागेल. विद्यापीठ ही अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वासही राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केला.