कोल्हापूर | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या संदर्भात त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकार निबंधक, बँक आणि कंपनीचे सदस्य, शेतकरी आणि अन्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्यांकडून हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले जात आहेत. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. दुसरीकडे जिल्हा बँकेच्या आणखी तीन संचालकांचे फोन नंबर ईडीकडून मागवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला चुकीच्या पद्धतीने पैसे पुरवल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा बँकेतून गडहिंग्लज कारखाना चालवण्यास घेतलेल्या ‘ब्रिक्स’ कंपनीला केलेला अर्थपुरवठाही वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात मुश्रीफ यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि घोरपडे कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर जिल्हा बँकेवरही छापेमारी केली आहे. तसेच ‘ब्रिक्स’ला केलेल्या कर्जपुरवठ्याबद्दल बँकेच्या आजी-माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे या तिघांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेणाऱ्या ‘ब्रीक्स’ कंपनीच्या कर्जप्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. बँकेच्या मागील संचालक मंडळातील या कर्जप्रकरणाशी संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता या दौऱ्यावर मुश्रीफ काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.