कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघणारे जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात ऍडजेस्टमेंट सुरू आहे. मात्र त्याला आता जालन्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे जालन्याचा पुढचा खासदार आणि आमदार आमचाच होणार, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे आता या दाव्यामुळे औरंगाबाद मध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येणार आहे.
‘मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी` या पायी दिंडीचा शुभारंभ चंद्रकांत खैरे, उपनेते लक्ष्मण वडले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खैरे यांनी जालन्याचा पुढचा खासदार आणि आमदार आमच्याच पक्षाचा होईल असा दावा केला. चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेसाठी सेटिंगचा आरोपदेखील केला.
खैरे म्हणाले, रावसाहेब दानवे यांना चकवा का म्हणतात? हे जालन्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. रावसाहेब दानवे आणि खोतकर हे कितीही भांडणाचे नाटक करत असले तरी त्यांचे सेटिंगचे राजकारण चालते. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे त्यांच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. त्यामुळे ते आतून सेंटिंग करतात; पण जालन्याचे लोक यांच्या राजकारणाला कंटाळले आहेत. मातोश्रीवर नुकतीच जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तेव्हा उद्धव साहेबांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जालन्याचा खासदार आणि आमदार आमचाच असेल असा ठाम विश्वास व्यक्त करत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.