आज शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार होत असताना दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. केवळ पक्षाच्या भरवशावर आमदार निवडून आणून दाखवा. जे निवडून येतात त्यांची स्वतःची लायकी, कर्तृत्व असते. पक्षाची मते केवळ १०-२० टक्केच असतात, असा घणाघात केला आहे.
शिवसेनेने संधी दिली म्हणूनच तुम्ही आमदार झालात, अशी टीका करण्यात आली होती. या टीकेला शिंदे गटासोबत गेलेले बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेने दिलेल्या संधीवर आणि धनुष्यबाणावर निवडून आले असते तर महाराष्ट्रात शिवसेनेचे २८८ आमदार राहिले असते, असे सणसणीत टोलाही संजय गायकडवाड यांनी लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अनेक जण ३०-३५ वर्षांपासून राजकारण-समाजकारणात आहेत. पाच ते सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. एक-एक लाख त्यांचे मताधिक्य आहे. त्यापैकी एकही जण आगामी काळात पडणार नाही. अजूनही आम्ही आमच्या मर्यादा सोडलेल्या नाहीत. त्यांचा मुलगा आमच्याविषयी वाटेल ते बोलतो. आम्ही अजूनही तोंड उघडले नाही. आम्हाला त्यांची गुपिते माहीत आहेत, ते जाहीर केली तर सगळे उघडे पडतील, असा थेट इशाराच संजय गायकवाड यांनी दिला.