नगर | जिवंत माणूस मृत दाखवून एलआयसीकडून 2 कोटी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकारामुळे एकाच खळबळ उडाली आहे. हा बोगस विमा मिळवण्यासाठी मदत केल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी नुकतीच श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे यांना या प्रकरणी अटक केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी यापूर्वी मुख्य आरोपी दिनेश प्रमोद टाकसाळे, त्याचे सहकारी अनिल भीमराव लटके, विजय रामदास माळवदे (सर्व रा. केडगाव) यांना अटक केली.
केडगाव येथील मुख्य आरोपी दिनेश टाकसाळे याने 2015 मध्ये एलआयसीच्या दादर (मुंबई) शाखेकडून 2 कोटींचा विमा घेतला होता. नंतर त्याने दोन वर्षे विम्याचे वार्षिक हप्ते भरले. दरम्यान, नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी शिवारात 25 डिसेंबर 2016 रोजी झालेल्या चारचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तो मृतदेह दिनेश टाकसाळे (रा. केडगाव) याचा असल्याचा दावा करण्यात आला. त्यासाठी श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे याने बनावट मृत्यू दाखला देण्यासाठी सहकार्य केल्याचा आरोप आहे.
दिनेशचा अपघाती मृत्यू झाल्याची कागदपत्रे सादर करत, 14 मार्च 2017 रोजी दिनेशच्या आई-वडिलांनी दोन कोटींच्या विमा रकमेवर दावा केला. हा दावा एलआयसीकडून मंजूरही करण्यात आला, परंतु या प्रकरणाची शंका आल्याने एलआयसीने चौकशी सुरू केली. तब्बल सहा वर्षे चौकशी केल्यानंतर दिनेश टाकसाळे जिवंत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोन कोटींचा बोगस विमा लाटल्याप्रकरणी एलआयसीच्या दादर शाखेचे सहायक प्रशासकीय अधिकारी ओमप्रकाश साहू यांनी शिवाजी पार्क (मुंबई) पोलिस ठाण्यात 21 फेब्रुवारी 2023 रोजी फिर्याद दिली.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुरुवातीला दिनेश टाकसाळे, अनिल लटके, विजय माळवदे यांना अटक केली. त्यानंतर बोगस मृत्यू दाखला देण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलिसांनी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे यास अटक केली.