राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. घोडबंदर येथील कावेसर येथे राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 मध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकासह काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेत मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी अनंत करमुसे यांचे अपहरण करत मारहाण केल्या प्रकरणी आव्हाडांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सुप्रीम कोर्टाने करमुसे यांची याचिका स्विकारत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. याचबरोबर ठाण्याचे पोलीस आव्हाडांना सहकार्य करत असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी अशी मागणी याचिकाकर्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. या तक्रारीमुळे आव्हाड यांच्या अडचणीत वाद होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जितेंद्र आव्हाड याच्याविरोधात अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. करमुसे मारहाण प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणी 14 ऑक्टोबर 2021 रोजी आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती.