एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संपूर्ण महाविकास आघाडी हादरली असून आता महाविकास आघडीचे भवितव्य एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे अशातच आज पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर निशाणा साधना आहे. ईडीच्या भीतीने किंवा अन्य काही आमिषांना बळी पडून काही आमदार पळाले असतील तर ते योग्य नाही. जे स्वत:ला बछडे, वाघ म्हणून घेत होते, ते म्हणजे पक्ष नाही. काल जो रस्त्यावर पाहिला तो खरा शिवसेना पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अद्यापही मजबूत आहे. काही आमदार, खासदार, नगरसेवक गेले याचा अर्थ पक्ष गेला असं होत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, “गेलेले आमदार का गेलेत त्याची कारणं लवकरच समोर येतील. काही लोक आमच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्यावर दबाव आहे. शिवसेनेचे १७-१८ भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यांच्या मदतीशिवाय अशाप्रकारे भाजपाशासित राज्यात आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही”, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
“आमचा शिवसेना पक्ष ही आमची संपत्ती आहे. उद्धव ठाकरे वर्षा वरून मातोश्री वर जाताना रस्त्यावर उतरली ती खरी शिवसेना. आमच्या संपर्कात शिवसेनेचे २० आमदार आहेत. त्यांना परत यायचंय असं ते म्हणत आहेत. ज्या प्रकारचे संकट आता आमच्यावर आले आहे त्या संकटाचा सामना करण्याचा पूर्ण अनुभव शिवसेनेला आहे. बाळासाहेबांसोबत आम्ही काम केले आहे. आम्ही बाळासाहेबांचे भक्त आहोत असं म्हणून ते भक्त होत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक पळून जात नाहीत”, असा खोचक टोला त्यांना लगावला.