राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांनी आज सकाळी ट्विट करत राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. पोलिसांनी ७२ तासांमध्ये दोन खोटो गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
खरात म्हणाले, आपण रस्त्यावरची लढाई लढूया; परंतु तुम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ नका, अशी विनंती खरात यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाडजी, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला संसदीय आणि रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल, असेदेखील खरात यावेळी म्हणाले. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला. त्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करत आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.
तर दुसरीकडे आशिष शेलार म्हणाले, आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले आरोप याचा काय संबंध? चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंडचे स्टेशन आले का? हे असे विचारण्यासारखे झाले. जर ते निर्दोष आहेत तर कायदेशीर बाजू लढावी. प्रत्येक निर्दोष व्यक्तीला आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची मुभा असते. ते सिद्ध करता येत नसेल तेव्हा हे वेडे चाळे केले जातात. त्यामुळे या आरोपांचा आणि आमदारकीचा संबंध नाही.