राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर तसेच १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे.एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या योजनेच्या विस्ताराची घोषणा देखील केली. राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी हे सारे उपक्रम, मोहिमा आपण हाती घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज येथे सांगितले. आज आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आपल्या सरकारची वाटचाल सुरू आहे. सामान्यांच्या जीवनाशी निगडीत असे आरोग्यविषयक विविध उपक्रम आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या पुढाकारातून राज्यभर हाती घेण्यात आली आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आजच्या दिवसाचं औचित्य साधत मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. मुंबईपाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखान्याचा शुभारंभ होणार आहे ही आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
तसेच राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयं, उपजिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, स्त्री रुग्णालयं, नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत “आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिरांत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होईलच, सोबतच त्यांना आवश्यक ते उपचार देखील मिळतील.