Latest Marathi News

BREAKING NEWS

Health | मिठाच्या अति सेवनामुळे जडत आहेत गंभीर आजार

0

 

आजकाल तर टूथपेस्टमध्येही मीठ आहे का, असा प्रश्न विचारला जातो. एकूण काय, मीठाशिवाय आपलं पानही हलत नाही. अनेक जणांना शिजवलेल्या अन्नात वरून आणखीन मीठ घालायची सवय असते. पण हीच सवय आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. जे लोक जेवताना, ताटातील पदार्थांवर आणखी मीठ घालून घेतात, त्यांचा वेळेपूर्वीच मृत्यू होण्याचा धोका असतो. 5 लाखांहून अधिक लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

युरोपियन हार्ट जर्नलमध्ये ही माहिती छापून आली आहे. ‘ जे लोक जेवणात कधीही (वरून) मीठ घालून घेत नाहीत किंवा क्वचितच मीठ घालतात, अशा लोकांच्या तुलनेत अन्नात वरतून मीठ घालून घेणाऱ्यांना वेळेपूर्वीच मृत्यू येण्याचा धोका 28 टक्के अधिक असतो.’ 40 ते 69 या वयोगटातील 100 पैकी तीन जणांना हा धोका असतो. जेवणात अतिरिक्त मीठाचा वापर केल्यानेच हा धोका वाढतो, असे या अभ्यासातून समोर आले आहे.

तसेच अमेरिकेतील, न्यू ऑर्लिन्स येथील ट्युलेन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ ॲंड ट्रॉपिकल मेडिसीन मधील प्रोफेसर ल्यु क्वी यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला आहे. जेवताना अतिरिक्त मीठाचा वापर आणि वेळेपूर्वी होणारे मृत्यू याच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास आमच्या संशोधनद्वारे करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य सुधारण्यासाठी जेवणाच्या पद्धतीत योग्य बदल करणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे.

कमी मीठाद्वारे सोडियमच्या ग्रहणात थोडासाही बदल झाल्यास त्याचा आरोग्याच्या दृष्टीने फार चांगला फायदा होऊ शकतो, असेही प्रोफेसर क्वी यांनी नमूद केले. जास्त मीठ खाण्याने आरोग्यास अपाय होऊ शकतो. अतिरिक्त मीठामुळे बीपीसारख्या समस्या वाढू शकतात. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मीठामधील सोडियम शरीराला आवश्यक असते, मात्र त्याचे अतिरिक्त सेवन हृदयासाठी घातक ठरू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.