मुंबई : हाथरस येथे एका मुलीवर बलात्कार करून खून करण्याची घटना घडली आहे. या घटनेवर समाजातील सर्वच स्तरातून संताप व्यक्त होतो आहे. या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीमध्ये जेंव्हा निर्भया प्रकरण झाले तेंव्हा आम्ही सर्वांनी संघर्ष केला. यात मीडियाची भूमिका अत्यंत महत्वाची होती मात्र आज सर्वांची शांतता अस्वस्थ करणारी आहे. ती मुलगी गरीब आहे म्हणून तिला न्याय मिळू नये का ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
एरवी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये कोणाच्या घराची कौलं उडवली तरी अन्याय झाला अन्याय झाला असा कांगावा करणारे लोक आज कुठे आहेत?. जोराजोराने ओरडणारा मीडिया आज शांत का? ट्विटरवर किंवा सोशल मीडियावर कोणतीच मोहीम नाही हे दुर्दैव आहे. सर्व सोशल एक्टिविस्ट आणि मीडिया आता शांत कसे ?
ती मुलगी नटी किंवा सेलेब्रिटी नाही, गरीब आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का. रामदास आठवले एका नटीला सुरक्षा मिळावी म्हणून तिच्या घरी जाऊन भेट घेतात, त्यांचे कार्यकर्ते विमानतळावर तिच्या स्वागताला जातात. इथे मात्र कोणीही बोलला तयार नाही. एके काळी देशात परिवर्तन घडवणारी दलित चळवळ आज शांत कशी ? असा सवालदेखील राऊत यांनी उपस्थित केला.
जेंव्हा दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण झाले तेंव्हा आम्ही सर्वांनी 15 दिवस संसदेचे कामकाज बंद पाडले होते. मीडियाने देखील यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र आजच्या सरकारमधील एकही महिला नेता यावर बोलायला तयार नाही. या सरकारची हाथरस प्रकरण हाताळण्याची पद्धत निराश करणारी आहे. कराण ती मुलगी गरीब आहे.
उत्तरप्रदेशात रामराज्य आहे असे म्हणता, मात्र त्या मुलीच्या कुटुंबाला दाबण्यात आले. उपोषणाला बसलेल्या तिच्या आईला खेचून बाहेर काढण्यात आलं. त्या मुलीवर अंतिम संस्कार करण्याआधी तिचा चेहरादेखील तिच्या कुटुंबीयांना दाखवण्यात आला नाही. या सर्व प्रकारवर मीडिया आणि सोशल एक्टिविस्ट शांत कसे ? त्यांचा आवाज कोणी दाबतय का ? असे एक ना अनेक सवाल संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले.