राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासुन उद्धव ठाकरे गट सतत शिंदे सरकारवर आणि त्यांच्या ४० आमदारावर सडकून टीका करताना दिसून येत आहेत तसेच या टीकेला शिंदे गटाकडून सुद्धा सडेतोड प्रतिउत्तर देण्यात येते. अशातच आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी साईटोड प्रतिउत्तर दिले आहे. त्यामध्ये गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडी म्हणजे प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी (Fifty-Fifty) असल्याचा खोचक टोला उध्दव ठाकरे यांना लगावला.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Jalgaon Visit)जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते जळगाव आणि चोपडा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. या पुलाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती. आता त्याचं भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या विषयावरून गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.
हा पूल व्हावा म्हणून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. आता त्याला एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला, असं सांगत गुलाबराव पाटील यांनी पुलाच्या कामाचे श्रेय उद्धव ठाकरेंना देण्यास नकार दिला. तर हे सगळ्यांचं श्रेय असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला पाठिंबा दिला. हा मनसेचा दिल से पाठींबा असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.