शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाठ यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना सल्लासुद्धा दिला आहे. संजय शिरसाठ म्हणाले नितेश राणे आता मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक राजकारण असतं. तिथं धमकी देणं योग्य नाही. आपण लोकांना जिंकायचं असतं. आपण लोकांना आपलसं करायचं असतं. तर ग्रामपंचयात आपोआप येते. अशा कुणाला दमदाट्या देऊन ग्रामपंचायत आणायच्या नसतात असे शिरसाठांनी नितेश राणेंना सांगितले आहे.
“माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही.” निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा. माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर मी एक रुपयाचा ही निधी देणार नाही, अशी धमकी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. मात्र राणे यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्याचाय्वर जोरदार टीका केली होती.
यावेळी ‘निर्भया’च्या वाहनांवरून संजय शिरसाठ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. निर्भया फंडातून घेण्यात आलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या गाड्या शिंदे गटाच्या आमदारांसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप होत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जर निर्भयाची एखादी गाडी गेली असेल, तर ती थांबली पाहिजे. आम्ही ती गाडी द्या, असं म्हणत नाही. संबंधित गाड्या या निर्भयासाठीच वापरली गेली पाहिजे, असे संजय शिरसाठ म्हणाले आहेत.