पुणे | पुणे जिल्हा परिषदेमार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘संकल्प २०२३-हर घर नल से जल’ कार्यशाळेचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले . या वेळी त्यांनी ‘हर घर नल से पानी’ संदर्भात उपस्थितांना माहिती दिली. देशात ‘हर घर नल से पानी’ योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च होणार असून या योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून महिलांचे कष्ट दूर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येत असून गावातल्या नागरी सुविधेतली उणिव येत्या दोन वर्षात भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील कामांबद्दलही या प्रसंगी त्यांनी माहिती दिली. जिल्ह्यात जनसुविधेची १४५ कोटी रुपयांची १ हजार ६७८ कामं मंजूर करण्यात आली असून नागरी सुविधेच्या ५६ कोटी रुपयांच्या ४७० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही या वेळी पाटील यांनी दिली. तसंच गावातील रस्त्यांची कामं दर्जेदार व्हावी, अशी अपेक्षा या वेळी त्यांनी व्यक्त केली.
देशात ‘हर घर नल से पानी’ योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे. ग्रामीण महिला खूप दूरवरून डोक्यावर हंडा ठेवून पाणी आणतात. ग्रामीण भागातील ९० टक्के आजार पाण्यामुळे होतात. हे आजार दूर करण्यासाठी आणि महिलांचे कष्ट दूर करण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. योजना सुरू करण्यासाठी आणि योजना पूर्ण झाल्यावर तिचा लाभ नागरिकांना देण्यासाठी उशिर करू नये, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सरपंचांना गावात कोणती योजना आणावी याची माहिती असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत केंद्राकडून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीपैकी ८५ टक्के रक्कम थेट मिळते आहे. त्याचा विनियोग करताना गावाच्या गरजा आणि समस्या लक्षात घेऊन विकासाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी तालुका पातळीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी‘घर घर जल’ घोषित गावातील सरपंचांचा, योजनेच्या अंमलबजावणीत चांगले काम केलेल्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेला जिल्ह्यातील सरपंच, जल जीवन मिशनच्या कामाचे कंत्राटदार आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत पाणीपुरवठा योजनांच्या कामाची गुणवत्ता, पाणी गुणवत्ता, कामांची तपासणी, गुणनियंत्रण, योजनेच्या उपांगांचे व्यवस्थापन व संनियंत्रण आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ आदी उपस्थित होते.