मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार यंदा देशभरात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अनेकांनी तिरंगा आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीला ठेवत यात आपला सहभाग नोंदवला आहे. तर दुसरीकडे जेकेपीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती ) यांनी नुकतंच आपला ट्विटरचा डीपी बदलला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुफ्ती मोहम्मद सईद यांचा फोटो शेअर केला. तसेच त्यासमोर तिरंग्यासह काश्मीरचा झेंडाही लावण्यात आला. यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून संताप व्यक्त केला आहे. फुटिरांचा उत्सव सुरू, स्वातंत्र्याचं अमृत कुठंय? असा संतप्त सवाल शिवसेनेने विचारला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘पक्षीय’ कार्यक्रम बनला आहे. देशातील सामान्य जनता मात्र स्वातंत्र्याचे अमृत कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.
पीडीपीच्या अध्यक्षा व आझाद कश्मीरच्या समर्थक मेहबुबा मुफ्ती यांनी सरळ भारतीय सार्वभौमत्वालाच आव्हान दिले. श्रीमती मुफ्तींकडून त्यांच्या ‘ट्विटर’ अकाऊंटवर कश्मीरचा ध्वज फडकवला. तिरंग्याच्या बाजूला कश्मीरचा ध्वज, असे हे चित्र आहे. कश्मीरातून 370 कलम रद्द केले, तसा हा त्यांचा स्वतंत्र ध्वजही रद्द केला. मोदी व अमित शहा प्रभृतींनी कश्मीर आता शंभर टक्के हिंदुस्थानचे अविभाज्य अंग झाल्याचे जाहीर करून आनंदोत्सवही साजरे केले, पण कश्मिरी पंडितांचे हाल असोत की फुटीरतावाद्यांचे दळभद्री खेळ, काहीच बदलल्याचे दिसत नाही. फुटीरतावादी संघटनांचे विषारी नाग फूत्कार सोडीतच आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.