मेक्सिको |
मेक्सिकोमध्ये बस ८० फूट खोल दरीत कोसळून भीषण बस अपघात झाला आहे. या बस अपघातात २९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, १९ जण जखमी झाले आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी पहाटे दक्षिण मेक्सिकोमध्ये बस दरीत कोसळली. या अपघातात २९ लोक ठार आणि इतर १९ जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दक्षिणेकडील ओक्साका राज्यात बुधवारी हा भीषण अपघात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका राज्यात बुधवारी प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. प्रांतीय वाहतूक पोलिसांनी ट्विट करत सांगितलं आहे की, बस मेक्सिको सिटीहून ओक्साका शहराकडे जात होती. अपघाताच्या कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.