देवेंद्र फडणवीस यांनाच नव्हे तर भाजपच्या अन्य नेत्यांनाही खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात डांबण्याचे षडयंत्र मविआ सरकारच्या काळात रचण्यात आले होते असा गौप्यस्फोट भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मांडलेल्या राजकीय ठरावात शुक्रवारी करण्यात आला. शनिवारी होणाऱ्या खुल्या बैठकीत राजकीय तसेच सहकार व कृषी विषयक असे दोन ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.
प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांच्या आजच्या बैठकीत आलेल्या राजकीय ठरावात, कांगावे करणारे, टोमणे मारणारे, सुडाच्या भावनेने काम करणारे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणारे सरकार आम्ही घालविले आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील हिंदुत्ववादी सरकार आणले असा हल्लाबोल करण्यात आला आहे.
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना आपल्या अटकेची सुपारी देण्यात आली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता. राजकीय ठरावात महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणाऱ्या या सूडपर्वाचा कार्यकारिणी निषेध करते असे ठरावात म्हटले आहे. महाविकास आघाडीने संविधानाची शपथ घेण्याचा दिखावा केला होता. सरकार चालविताना मात्र त्या तत्त्वांना हरताळ फासला. सत्तेचा वापर दडपशाही आणि सुडासाठी केला. सरकारी वकिलाला हाताशी धरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अडकविण्याचे प्रयत्न झाले होते, असे स्पष्ट आरोप ठरावात आहेत.
तसेच कोणत्या भाजप नेत्यांना मविआ सरकारच्या काळात जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले होते यावर प्रकाश पडणार का? याबाबत उत्सुकता आहे. फडणवीस यांना तुरुंगात डांबण्यासाठी मुंबईच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांना सर्वोच्च पातळीवरून जबाबदारी देण्यात आली होती, असे ठरावात नमूद केले आहे.