एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी करत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केलं. शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले. शिवसेनेच्या इतिहासातील आजवरचं हे सर्वात मोठं बंड मानलं जात आहे. यातच आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार देखील वेगळा विचार करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शिवसेना खासदारांच्या एका गटानं शुक्रवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच भाजपाच्या एका केंद्रीय नेत्यानं दावा केला की शिवसेनेतील आमदारांच्या बंडाचे परिणाम खासदारांवरही पाहायला मिळतील. शिवसेनेच्या १९ पैकी कमीतकमी डजनभर खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात आहेत.
शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. सुत्रांच्या माहितीनुसार पक्षातील ज्येष्ठ नेत्यानं शिंदेंच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांना पक्षात सामील करुन घेण्याबाबतची विनंती उद्धव ठाकरेंकडे केली. यावर ठाकरेंची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पण शिवसेनेच्या बैठकीनंतर शिंदेंवर पक्षाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे खासदारांनी केलेली विनंती उद्धव ठाकरेंनी धुडकावल्याची चर्चा होत आहे