काही दिवसांपूर्वी राष्ट्र्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल येथील घरावर ईडीने छापे टाकले होते अशातच काल सकाळी मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर ईडीने चौकशीसाठी छापा टाकला आहे. अशातच आता चौकशीनंतर मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांना पोलिस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आले. ईडीने तब्बल ३० तास ‘ब्रिक्स’ व ‘ संताजी घोरपडे’ साखर कारखान्याशी संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी करण्यात आली.
ईडी’च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह हरळी (ता. गडहिंग्लज) व सेनापती कापशी (ता. कागल) येथील शाखा व संताजी घोरपडे कारखान्यांवर छापे टाकले. बुधवारी दिवसभर व रात्रभर त्यांनी तपासणी केली. दोन साखर कारखान्यांशी संबंधित सर्व व्यवहारांची त्यांनी कसून चौकशी केली. स्थानिक राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांसह ‘ईडी’चे २२ अधिकारी दोन दिवस बँकेत ठाण मांडून बसले होते.
दुपारी साडेचार वाजता चौकशी संपल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सायंकाळी पाच वाजता मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर व राजू खाडे यांना समन्स बजावून ताब्यात घेतले. पावणेसहा वाजता पोलिस बंदोबस्तात ईडीच्या पथक अधिकाऱ्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले.