Latest Marathi News

BREAKING NEWS

सरकारी नोकरी सांभाळून लोकांना मोफत दिल्या इकोफ्रेंडली गणेशमूर्ती..!!

0

औरंगाबाद : जिथे असते आवड तिथे निघते सवड याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुरेश रंगदाळ, पेशाने साईंटिफ फोटोग्राफर म्हणून सी. आय. डी.मध्ये १९९९ पासून कार्यरत आहेत. गेली ६ वर्ष ते आपल्या घरच्या गणपती साठी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवत आहेत.

गणपतीमध्ये घरी येणाऱ्या लोकांनी या मूर्तीचे दरवर्षी कौतुक केले. मूर्तीची ठेवण, भाव लोकांच्या काळजाला हात घालत होते. आम्हाला देखील अशी मूर्ती बनवून द्या आम्ही हवे तेवढे पैसे देऊ असा तगादाच सर्वांनी रंगदाळ यांच्या मागे लावला होता. परंतू, नोकरीमुळे हे काम मागे पडत राहिलं. यावर्षी मात्र त्यांनी मनावर घेऊन ११ इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवल्या आणि हा हा म्हणता त्या बुक देखील झाल्या. मात्र बाप्पा वरची नितांत श्रद्धा आणि लोकांनी पर्यावरण पूरक सण-उत्सव साजरे करावे या भावनेने त्यांनी कोणाकडून एकही रूपाया घेतला नाही. हे काम मी पैशासाठी करत नाही यात मला पैशापलीकडचा आनंद आहे, असे रंगदाळ सांगतात.

पत्नीने काम करण्यास प्रेरणा दिली

सुरेश रंगदाळ यांची पत्नी सौ माधुरी रंगदाळ सन २००० पासून औरंगाबादच्या महिला कॉलेजला संस्कृतच्या लेक्चरर आहेत. सुरेश रंगदाळ यांना इकोफ्रेंडली गणेश मूर्ती आपल्या बरोबरच लोकांसाठी देखील बनवल्या पाहिजेत यासाठी त्यांच्या पत्नीने उद्युक्त केले. मुलगी सिद्धी आणि मुलगा साई आणि स्वतः संतोष हे तिघे मिळून गेली ६ वर्ष मूर्ती घडवत आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये मुलीची नीटची परीक्षा असली तरीही ती अभ्यास सांभाळून आवर्जून या कामाला वेळ देते.

सुरेश रंगदाळ यांना फोटोग्राफीसाठी नॅशनल लेव्हल गोल्डमेडल मिळाले आहे. सुरुवातीला सोलापूरला केसरी मध्ये त्यांनी काही वर्ष फोटोग्राफीचे काम केले. आजही मुंबईमध्ये नोकरी असली तरी शनिवार रविवार ते मूर्ती बनवण्यासाठी वेळ काढून घरी येतातच. काही आनंद हे पैशांच्या पलीकडे असतात हेच सुरेश रंगदाळ यांच्याकडे पाहिले की वाटते..!!

Leave A Reply

Your email address will not be published.