Latest Marathi News

BREAKING NEWS

हलाखीचे जिणे, ज्येष्ठ अभिनेत्याने मागितली इच्छामरणाची परवानगी

0


माहिमकरांना डाळ-भातावर कंठावे लागतेय जीवन, भावाकडूनही त्रास
मुंबई : प्रतिनिधी
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांना ‘जत्रा’, ‘ही पोरगी कोणाची’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले. आयुष्यभर प्रेक्षकांचे मनोरंजन केले, पण आता उतार वयात मात्र मनमोहन माहिमकरांचे दैनंदिन आयुष्य जगणेही कठीण झाले आहे. त्यांना इच्छा मरण हवे आहे, अ‍ेसेही ते सांगतात. दररोजचे जेवण जेवायलाही त्यांच्याकडे पैसे नाहीत, कसेबसे डाळ-भात, दही-भात खाऊन ते आपले आयुष्य ढकलतायत, एवढे भोग कमी की काय? तर कित्येक वर्षांपूर्वी सोडून गेलेला भाऊ आता पुन्हा आला असून त्यांना प्रॉपर्टीसाठी त्रास देत असल्याचेही त्यांनी सांगितले तर भावाची बायको त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे. त्यामुळे या अभिनेत्याने इच्छामरणाची परवानगी माहितली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी आपली व्यथा मांडत मनातील दु:ख व्यक्त केले. आता मात्र मनमोहन माहिमकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून काम मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत, असेही ते म्हणाले. वय झाल्यामुळे माझी काळजी घेण्यासाठी कोणी तयार नाही. एकट्याला घर खायला उठते, असेही त्यांनी सांगितले.

अभिनेते मनमोहन माहिमकर म्हणाले की, आता काम नसल्यामुळे मी पोरका आहे. मला कोणीच नाही आणि आमची जुनी बिल्डिंग होती, ती आता डेव्हलपमेंटला गेलेली आहे. पहिलें दोन-तीन वर्ष बिल्डर्सनी भाडे दिले, आता देत नाहीत. मी एकटा राहतो, भात चढवतो, डाळ- भात करतो. फक्त… कधीतरी बाहेरुन चपात्या आणतो, कधी तरी भाजी आणतो. मटण खाण्यासाठी माझ्याकडे पैसे उरलेलेच नाहीत. त्यामुळे ती इच्छा मी मारून टाकतो… पैसे नसल्यामुळे साधेच काही तरी जेवतो… कधी दही-भात खातो, कधी लोणचे भात खातो… आणि कसे तरी दिवस काढतो… कोणी आता राहिलेले नाही या वयात माझ्याबरोबर… वय झाले माझे, कोण माझ्याकडे आता बघायला तयार नाही…

मला मोठा भाऊ आहे… ६९ सालापासून लग्न करुन निघून गेला होता, त्यानंतर ५०-५५ वर्षांत कधी आलेलाच नाही… रेशन कार्ड वैगरे सगळं घेऊन गेला… आणि आता त्याला माहीत पडलं आमच्याकडे डेव्हलपमेंट होत आहे. माझ्याकडे आला, आता मला जागा विकायला लावत आहे, मला बोलतो एक तर तू आश्रमात जा आणि तिकडे राहा आणि जागेची वाटणी कर… एवढं असताना मी त्याला सांगितले, मी मेल्यावर तुला जागा मिळणारच आहे, तो काय म्हणतो, मी काय तुझ्या मरणाची वाट पाहू का? त्याने आणि त्याच्या बायकोने मला कोर्टात खेचले. पुरावे नसताना आता माझे जीवन जगणे खूप कठीण होत चालले आहे, मला वहिनीने सांगितले की, तू जर ही जागा विकून आम्हाला पैसे नाही दिले, तर मी बाईमाणूस आहे मी तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन आणि ही जागा मिळवून दाखवेन, अशी धमकी दिल्याचे म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.