Latest Marathi News

BREAKING NEWS

“डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ” संजय राऊतांची घणाघाती टीका

0

खासदार संजय राऊत हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. गद्दार गेल्यानंतर संघटन मजबूत होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्‍वाखालील शिवसेनेचा कोल्हापुरात मेळावा होत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आज कोल्हापुरात दाखल झाले होते.

संजय राऊत यांनी यावेळी पत्रकार परिषदेत, कसबा, चिंचवडच्या पोटनिवडणुकीत यंत्रणांचा गैरवापर झाला आहे. कायदा आणि पोलिस कोणाच्या मर्जीने नाचताहेत? अशी विचारणा त्यांनी केली. 2024 ला सगळ्यांचा हिशेब देऊ, असा इशारा त्यांनी दिला. जनतेच्या गर्जनेला बळ देण्यासाठी आम्ही फिरत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला बाळासाहेबांनी पदे दिली आहेत, त्यामुळे त्यांनी पदावरून काढलं, तरी आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ” असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

संजय राऊत यांनी कणेरी मठावरून झालेल्या गायींच्या मृत्यूवरून हल्लाबोल केला. अशा पद्धतीने गायींच्या मृत्यू अन्य राज्यात निघाला असता, तर हिंदू आक्रोश मोर्चा निघाला असता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गायींचा मृत्यू होतो. रेडाबळीप्रमाणे हा बळी आहे का? या प्रकरणाची चौकशी करावी, पण हे हत्याकांड असल्याचा आरोप त्यांनी केला. गायींच्या मृत्यूबाबत अजूनही स्पष्टता येत नसल्याने त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी हे दबावाचं राजकारण सुरु असल्याचा आरोप केला.

दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर कोल्हापुरात होणाऱ्या या पहिल्याच मेळाव्याला ‘शिवगर्जना’ असे नाव दिले आहे. या मेळाव्यात आगामी निवडणुकीचे रणशिंग ठाकरे गटाकडून फुंकले जाणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या मेळाव्याच्या निमित्ताने राऊत पहिल्यांदाच कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जिल्ह्यातील दोन्ही खासदारांसह शिंदे गटात केलेल्या आजी-माजी आमदारांना लक्ष्य केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.