Latest Marathi News

BREAKING NEWS

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..!!

0

लातूर : राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची काल प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. काल रात्री अहमदपूर येथील भक्तिस्थळ या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी (31 ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते.त्यातच आज अप्पांचे निधन झाले.

भक्तिस्थळ या ठिकाणी बिचकुंदा मठ संस्थानचे मठाधीश सोमलिंगेश्वर शिवाचार्य महाराज समाधीच्या विधीची व्यवस्था पाहात होते. संपूर्ण विधिवत समाधी विधी त्यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आला. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेवून समाधी विधी पार पाडणाऱ्या सर्व लोकांना पीपीई किट देण्यात आले होते. समाधीच्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा प्रवेश बंद करण्यात आला होता. लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि लातूरचे पोलिस अधीक्षक राजेंद्र माने यांच्या नेतृत्वात संपूर्ण पोलिस दल या ठिकाणी हजर होते.

बंदुकीच्या फेरी झाडून शासकीय मानवंदना देण्यात आली. औसा मतदरसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी पुष्पचक्र अपर्ण केले. रात्री साढे अकरा वाजता संपूर्ण विधि पार पडला. यावेळी अनेक शिवाचार्य महाराज हजर होते. समाधी विधी संपन्न होत असताना अहमदपूर मठाचे उत्तराधिकारी राजेश्वर स्वामी आणि हाडोळती मठाचे उत्तराधिकारी राजकुमार स्वामी यांना मठाचा कारभार सोपवण्यात आला.

राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे सामाजिक आणि आध्यात्मिक कामातील योगदान लक्षात घेऊन त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत अशी विनंती मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ त्यास मंजूरी देत प्रशासनास तशा सूचना केल्या.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग

राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे

कोण होते अहमदपूरकर महाराज?

लिंगायत समाजातील नावाजलेल्या महाराजांपैकी एक. वयाच्या 104 वर्षीही ते कार्यमग्न असे.अहमदपूर मठाशी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या भागातील भक्तगण जोडलेले आहेत. लाहोर विद्यापीठात स्वतंत्र पूर्व काळात एमएमबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. लिंगायत धर्म प्रसारात ते सतत कार्यरत राहिले.
वृक्ष जोपासना, राष्ट्र धर्म, राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनात त्यांची भूमिका आणि सहभाग महत्वाचा होता. यासाठी राज्यभर लाखोंच्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे उत्तम संबध होते.

मान्यवरांची आदरांजली

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते पण या क्षेत्रात त्यांचे मन रमले नाही. विरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यासाठी त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी दोनवेळा तुरुंगवासही भोगला..

विरशैव तत्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृत, उर्दू, मोडी, पारसी, इंग्रजी, कन्नड, मराठी अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभृत्व होते. त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. धार्मिक, सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही शिवाचार्य महाराजांचे कार्य उल्लेखनीय आहे. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गाव खेड्यात शिक्षणाची गंगा पोहोचवली. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे त्यांच्या कार्यातून लिंगायत समाजाच्या कायम स्मरणात राहतील, अशी श्रद्धांजली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अर्पण केली.

धनंजय मुंडे

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने समाजाची अपरिमित हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. अहमदपूरकर महाराज यांचे नुकतेच निधन झाले असून मृत्यूसमयी त्यांचे वय १०४ वर्षे होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते. महाराजांच्या निधनाने महाराष्ट्रासह विविध राज्यातील त्यांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे.

अशोक चव्हाण

वार्धक्याला झुगारून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शांत चित्ताने मुक्तीची वाट पाहिली. आयुष्यभर अध्यात्मासमवेत समाज सेवेचे व्रत त्यांनी बाळगले. लाखो भक्तांना त्यांनी विवेकाचा मार्ग दाखवित अंधश्रद्धेविरुद्ध जागर सुरु ठेवला. वास्तवाशी आणि सत्याच्या जवळ जाणारे त्यांचे बोल असल्याने त्यांच्या शब्दाला भक्तांनी प्रमाण मानले. सतत समाजाच्या भल्याचा विचार आपल्या कृतीतून चालू ठेवणारा एक दीप आता मालवला आहे” या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.