मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यात कालपासून सावरकर गौरव यात्रा सुरू केली. मात्र या यातला पाहिजे तितका प्रतिसाद मिळाला नाही. मात्र या यात्रेवरून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. विनायक दामोदर सावरकर यांना दाढीचा प्रचंड तिरस्कार होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या दाढीला कात्री लावतील काय? गुळगुळीत दाढी करतील काय? असा सवाल ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला.
धर्माचे राजकारण करून पोळ्या भाजायच्या हे मिंधे सरकारचे धोरण आहे. त्यावरच सर्वोच्च न्यायालयाने टीका केली आहे. आता हिंदुत्वाच्या नावावर सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. ज्यांनी कधी सावरकरांच्या साहित्याची चार पाने चाळली नाहीत, ते आता सावरकर गौरव यात्रा काढत आहेत. सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढायाची तर काढा. पण त्याआधी त्यांना भारतरत्न तर द्या. भारतरत्न पुरस्कार हाच सावरकरांचा खरा गौरव ठरेल, असा टोला अग्रलेखातून लागवण्यात आला.
विनायक दामोदर सावरकर यांना दाढीचा अत्यंत तिरस्कार होता. त्यासाठी त्यांनी तुर्कस्तानच्या केमाल पाशाचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे सावरकरांना मान्य नसलेल्या दाढीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुळगुळीत कात्री लावतील काय? असा सवाल सामानातून विचारण्यात आला. दाढी वाढवण्याचे प्रकार, शेंडी, जानवे, गाईला गोमातेचा दर्जा देणे आदी कर्मकांड सावरकरांना मान्य नव्हते. त्यांना जादूटोणा, मंत्रतंत्र आणि रेडाबळी अशा गोष्टीही मान्य नव्हत्या.
तसेच गौरव यात्रा काढणारे सावरकरांच्या या विचारांचाही प्रसार करणार काय? असा प्रश्नही अग्रलेखातून करण्यात आला. सध्याच्या काळात हिंदुत्वाच्या नावावर काहीही खपवले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांना तर धर्माचे राजकारण मान्य नव्हते. मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. पण सध्या महाराष्ट्राचे राजकारण खोमेनीच्या मार्गानेच सुरू आहे, असे सांगतानाच आता हा खोमेनी कोण? हे डॉ. मिंधे यांनी विचारू नये, असा शब्दात अग्रलेखातून खडेबोल सुनावण्यात आले.