शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याची निर्णय मात्र त्या आधीच होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर आज सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता त्यावर काय निर्णय होतो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे अशातच यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
६६ सालापासून धनुष्यबाण हे चिन्ह देव्हाऱ्यात पुजलं जात होतं ते शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गद्दारांनी गोठवलं, असे म्हणत ठाकरे गटातील भास्कर जाधव यांनी शिंदे गट आणि शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. हे ४० गद्दार शिवसेना सोडून गेली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी होतं, असेही ते म्हणाले.
दापोली विधानसभा मतदारसंघात भगव्या सप्ताहाला सुरूवात झाली असून सोमवारी याबाबत ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी माहिती दिली. तेव्हा ते पत्रकारांशी संवाद साधत होते. या संवादादरम्यान भरसभेत योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघात शिंदे गटावर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, माजी आमदार सुर्यकांत दळवी, जिल्हा प्रमुख सचिन कदम, युवासेना राज्य कार्यकारणी कोअर कमिटी सदस्य आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव उपस्थित होते.