मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला होता. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. यातच महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी समर्थन केले आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर पुढचा पेच प्रसंग टाळता आला असता, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावर बोलताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा व्हायला हवी होती. वास्तविक नाना पटोले यांनी त्यावेळी अध्यक्ष पद सोडायला नको होते. त्यांनी जर अध्यक्षपद सोडले नसते तर हे सर्व घडले नसते. मात्र, आता यावर सार्वजनिक चर्चा करणे योग्य नाही. आमच्या पातळीवर आम्ही चर्चा करु. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर जास्त बोलू शकत नाही, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला गंभीर आहे. पोलीस विभागाने अशा घटनांबाबत काळजी घेणे गरजेचे आहे, असे वळसे-पाटील म्हणाले. तसेच शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही भाष्य करताना, सर्वप्रथम आमदारांच्या निलंबनावर निर्णय व्हायला हवा. न्यायालयात यावर ताबडतोब सुनावणी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.