मुंबई : अनलॉक १.० किंवा पुनःच हरिओमच्या घोषणेनंतर राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय हा ज्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून, स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु आकडा वाढण्याचे महत्वाचे कारण महाराष्ट्रात टेस्टची संख्या देखील जास्त आहे. देशाच्या तुलनेत सगळ्यात जास्त टेस्टिंग महाराष्ट्रात करण्यात आली.
राज्यात आज ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ५३ हजार ९७८ नमुन्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ टक्के एवढा आहे.