नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असली तरी उमेदवारीबाबत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोन्ही नेत्यांनी नवे जाहीर केलेली नाहीये. शिक्षक परिषदेने बावनकुळे यांना पत्र लिहून तर शिक्षक भारतीने पटोले यांना पत्र लिहून समर्थन मागितले होते. मात्र, एकाही प्रदेशाध्यक्षाने पत्राला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे इच्छुक शिक्षक उमेदवार वेटिंगवर असून त्यांचे टेन्शन वाढले आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी ३० जानेवारी रोजी मतदान होईल. ५ ते १२ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करायचे असून १३ जानेवारीला छाननी होईल. १६ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. अर्ज भरण्याची तारीख तोंडावर आली असली तरी दोन्ही प्रमुख पक्षांनी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून दोनदा विधान परिषदेत पोहोचलेले नागो गाणार आता हॅट्ट्रिकसाठी रिंगणात उतरण्यास सज्ज आहेत.
भाजपने गाणार यांना समर्थन, सहकार्य व पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी करणारे पत्र शिक्षक परिषदेने ३ ऑक्टोबर २०२२ रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले होते. मात्र, तीन महिन्यांनंतरही बावनकुळे यांनी या पत्राला उत्तर दिलेले नाही. दोन टर्मपासून भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा पुन्हा एकदा कायम राखण्यासाठी भाजपने गोळाबेरीज सुरू केली आहे.
विद्यमान आमदार नागो गाणार यांच्याऐवजी यावेळी दुसऱ्याला संधी द्यावी, असा पक्षात सूर आहे. गाणार यांना थांबविण्याचा निर्णय झाल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून नागपूर विभाग कार्यवाह योगेश बन यांचे नाव समोर केले जाऊ शकते. यावेळी उमेदवारीसाठी भाजप शिक्षक सेलनेही आग्रह धरला आहे. भाजपच्या शिक्षक सेलच्या महाराष्ट्र संयोजक व शिक्षण मंचच्या अध्यक्ष माजी महापौर कल्पना पांडे, शिक्षक सेलचे विदर्भ संयोजक अनिल शिवनकर व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांचेही नाव चर्चेत आहे.