राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी काल रविवार १८ डिसेंबर मतदान पार पडले.या निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. या निवडणुकीबाबत गिरीश महाजन यांनी मत मांडले. “७० ते ७५ टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष नावालाही राहणार नाही.” असे ते म्हणाले.
पुढे महाजन म्हणाले की, “राज्यात ज्या-ज्या ठिकाणी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी बहुतांशी ग्रामपंचायतींवर भाजपचेच उमेदवार विजयी होणार. जळगाव जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता येणार. राज्यातही हीच परिस्थिती राहणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष कुठे नावालाही उरणार नाहीत.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपविषयी व्यक्त केलेला विश्वास निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत किती यश मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २० डिसेंबरला मतमोजणी केल्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मतमोजणी ही आपापल्या ग्रामपंचायतीच्या तालुक्याच्या ठिकाणी केली जाणार आहे.