राणे कुटुंबीय नेहमीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. अशात खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार नारायण राणे यांच्यावर टीका करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी एक ट्वीटही केले आहे. त्यांच्या याच ट्विटवर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार नारायण राणेंविषयी खोचक शब्दांत टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित पवारांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचाही संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेने केल्याचे विधान केले आहे. “नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना”, असे अजित पवार या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.
यावर नितेश राणेंनी ट्वीटद्वारे प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, “अजितदादा मोठे नेते पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले. शाम सावंत सोडून. माहिती असुदे दादा..बस या वेळी माझा मित्र पार्थला निवडून आणा.”
याचबरोबर, “गेल्या वेळी बिचारा. एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला. म्हणून ते काही होत का बघा. राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री.. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात. तुमचा आवडता टिललु.” असेही नितेश राणेंनी म्हटले आहे.