Latest Marathi News

BREAKING NEWS

“सासूचे चार दिवस संपले, आता सुनेचे…”; अजित पवार यांचा शरद पवारांना टोला

0

बारामती : बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले आहेत. आज माजी सैनिकांच्या मेळाव्यात भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले. 

“काही वडीलधारे जुना काळ आठवत असतील तर त्यांना म्हणा की जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या. नुसते सासू सासू…मग सुनेने काय नुसते बघत बसायचे का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे पाहतो. मग ४० वर्ष झाले तरी बाहेरची कशी? किती वर्ष झाल्यावर या घरची ते सांगा?”, असा टोला यांनी अजित पवार नाव न घेता शरद पवार यांना लगावला.

“मी एक वेगळी भूमिका घेतली. मी एकटा नाही तर प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि ८० टक्के पेक्षा जास्त आमदारांनी ही भूमिका स्वीकारली. याचे कारण आपले प्रश्न सुटावे. गेल्या १२ वर्षात केंद्र सरकारचा बारामती मतदारसंघात निधी आलेला नाही”, असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले, “या सभेला बसलेले काही लोक आज माझ्या सभेला आले. मी ज्यांच्या विरोधात लढतो आहे, ते आले की त्यांच्याही सभेला जातील. पण दोन डगरीवर हात कशाला? आपल्याकडे एक पद्धत आहे कुंकू एकाचेच लावायचे असते. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे. आता जे लोक तुम्हाला ओळखतही नव्हते, ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. काहीजण भावनिक मुद्दा करतील, पण तुम्ही वेगळा विचार करु नका. विधानसभेला बघू असे म्हणताण आणि तुमच्या पायावर धोंडा पाडून घेताल”, असे अजित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.