Latest Marathi News

BREAKING NEWS

बंडखोरीनंतर शिंदे गटाला मोठा धक्का, उद्धव ठाकरे गटाला निवडणुकीत पहिलं यश

0

 

 

 

सोलापूर | एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर सेनेचे तब्बल ५५ पैकी ४० आमदार आणि १२ खासदार फुटून शिंदे गटात सहभागी झाले. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील सत्तेतून पायउतार झालेल्या उद्धव ठाकरे यांना सोलापूरच्या निवडणुकीच्या निकालाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ७ सदस्य असलेल्या चिंचपूर ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाला जोरदार यश मिळालं असून ७ पैकी ७ सदस्य ठाकरे गटाचे निवडून आले आहेत.

 

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरात देशमुख यांचे वर्चस्व आहे. मात्र चिचंपूरमधील ग्रामपंचायतीच्या निकालाने उद्धव ठाकरे गटाने बाजी मारत भाजपाचा पराभव केला आहे. राज्यात आज १५ जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार असून या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. यात पहिला निकाल चिंचपूर ग्रामपंचायतीचा लागला असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आल्यानं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीच्या निकालात स्थानिक पातळीवरील राजकारण असले तरी त्यातून जनमाणसाचा कानोसा घेतला जातो. चिंचपूरच्या निकालानंतर आता उर्वरित ग्रामपंचायीत कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्व राजकीय पक्षांना लागली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.