विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदरांवार राऊतांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरेंचे नाव म्हणजे आग, त्यामुळं आगीशी खेळू नका, असा विरोधकांना इशारा दिलाय. राज्याची जनता महाराष्ट्रातील नव्या सरकारला स्वीकारणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना पुढे जाणार आहे. शिवसेना खचणार नाही तर, लढणार”, असंही त्यांनी म्हटलंय.
नुकताच संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटलंय की, “बाळासाहेब ठाकरेंचं नाव हे आग आहे, त्यामुळं आगीशी खेळण्याचा प्रयत्न करु नका. आतापर्यंत ज्यांनी आगीशी खेळण्याचा प्रयत्न केलाय त्यांचं केवळ हात पोळले नाहीत, तर त्यांची राजकीय कारकीर्दही पोळली आहे, असंही सांगत त्यांनी भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे. त्यामुळे हे जे आमचे आमदार तुम्ही कैद करून ठेवलेले आहेत किंवा तुमच्या ताब्यात ठेवलेले आहेत जनता त्यांचा निर्णय घेईल.
तसेच आम्ही त्यांच्याविषयी बोलणं आता आम्ही थांबवलं आहे आता ते महाराष्ट्रात आले आहेत. त्यांना त्यांच्या मतदार संघातही जायचं आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला असेल. त्यांना लखलाभ ठरो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुढे घेवून जावू आणि हीच शिवसेना भविष्यात या राज्याचं नेतृत्व करेल हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो.