राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेले दिसून येत आहे अशातच आता उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर घणाघाती टीका करण्यात येत आहे या टीकेला शिंदे गटाकडून सडेतोड प्रतिउत्तर देण्यात येते. ‘बाळासाहेबांचे नाव वापरू नका’, हे उद्धव ठाकरे अनेकदा बोलून चुकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या या बोलण्याला फार महत्त्व दिल्यास ते चुकीचे होईल असे मला वाटते. उद्धव ठाकरेंसोबत मी ३५ वर्षे होतो. त्यांचे शब्दप्रयोग मला माहिती आहेत. त्यामुळे आम्ही रक्त पिणारे ढेकूण नसून रक्त देणारे शिवसैनिक आहे, असे प्रत्युत्तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
पाचोरा येथील सभेत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ते अजिंठा विश्रामगृहात बोलत होते. बाळासाहेब ही उद्धव ठाकरेंची स्वतःची प्रॉपर्टी नाही. मात्र ते त्यांचे वडील आहेत. हे आम्ही मान्य करतो. पण बाळासाहेब या देशाची प्रॉपर्टी आहे. बाळासाहेब तमाम जनतेसाठी आदर्श आहेत. त्यामुळे त्यांचे नाव कोणीही वापरेल. महापुरुषांचे फोटो, नाव वापरणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव महानगर, ममुराबाद, नशिराबाद व मेहरूण परिसरातील शेख इकबाल शेख सलीम, अखिल मुलतानी, अजमल मिर्झा, शरीफ शह धीरज सरपटे, मजीद शेख, जुबेर शाह, आमीन शेख, सलीम खाटीक, साजिद शेख, रईस पटेल, अब्दुल पटेल, समीर पटेल, बाबू मुलतानी, सोहेल मुलतानी, दानिश मुलतानी यांच्यासह अनेक मुस्लिम व इतर युवक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मंत्री पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.