येणाऱ्या काही तासात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या आमदारानेच हा दावा केला आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी यासंबंधी माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत.
दिल्लीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शिंदे-फडणवीस यांची भेट निश्चित असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचीही शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती लगेच पुढे येईल,असे संजय गायकवाड म्हणाले.
ते म्हणाले, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळावे यासाठी अनेक आमदार इच्छुक आहे. सगळ्यांना वाटतंय, मंत्रिपदाचा विस्तार व्हावा. त्यासाठीच राज्याचे दोन्ही नेते दिल्लीला गेले आहेत. मी मंत्रीपदाची मागणी केलेली नाही. पण लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल अशी चर्चा आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप करताना संजय गायकवाड म्हणाले, आम्हाला दगड धोंड गृहीत धरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या चिखलात टाकले होते. त्या चिखलातून झेप घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि आता नैसर्गिक युतीच्या सरकारसोबत काम करत आहोत.विधान भवनातील तैलचित्र हा दांभिकपणा आहे. हिंमत असेल तर तुमच्या वडिलांच्या नावावर निवडणूक लढवा, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नका, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
त्यावर संजय गायकवाड म्हणाले, बाळासाहेब ही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. राष्ट्रपुरुष सगळ्यांचे असतात. त्यांचा फोटो आणि कार्यक्रम सादर करण्याचे अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहेत. कुणी वैयक्तिक हक्क सांगू शकत नाही. शिवसेना भाजप म्हणून आम्ही एकमेकांची माणसे आहोत,असेही संजय गायकवाड म्हणाले.