नगर | मंत्रिमंडळ विस्तारानंतर रविवारी अखेर खाते वाटप झालं आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर नगरमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून पुत्र खासदार सुजय विखे यांनी भाजपनं दिलेल्या मानाचा पेढा असं वक्तव्य करत वडिलांना पेढा भरवला.
कोल्हार येथील देवीच्या दर्शनानंतर सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दोघांनीही भाजपनं दिलेल्या आदराबाबत आभार व्यक्त केले. तसेच, महसूल खातं बदनाम झालं होतं, त्यामुळे आता अभ्यास करून खात्यात पारदर्शकता आणणार असल्याचं वक्तव्य करत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
नवनिर्वाचित महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना म्हटलं की, “माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. पक्षाच्या प्रति निष्ठा आणि काम करण्याची तयारी असेल तर संधी मिळते आणि त्याच भूमिकेमुळे मला मोठी संधी काम मिळाली आहे. या संधीबद्दल पक्षाच्या सर्वांचे आभार.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “महसूल खात्याचा अभ्यास आधी करावा लागेल. खातं पूर्वीपासून बदनाम झालेलं होतं, या खात्यात प्रथम पारदर्शकता आणताना लोकाभिमुख कारभार करण्याचं मोठं आव्हान आहे आणि ते मला करायचं आहे.