उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्यास मोदी सरकारनं मंजुरी दिली आहे. पण या नावावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण होणार आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायेत. तर दुसरीकडे या नामांतरणानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी सूचक विधान केले आहे.
औरंगाबादच्या नामांतराला मंजूरी मिळाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सुरवातीपासून अश्याप्रकारे नाव बदलण्याला आमचा विरोध आहे. आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनेक कार्यक्रमांना मी हजेरी लावतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आदर आहेच.
पुढे बोलताना जलील म्हणाले की, औरंगाबाद आणि औरंगजेबाचा काही संबंध नाही. मुस्लीम लोक त्याला मानत नाहीत. या नामांतराचं एक औरंगाबादकर म्हणून मला दुःख आहे. पण नामांतराचा निर्णय योग्य नाही”, असं जलील म्हणाले. तसंच केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही लढा उभा करू, असा इशाराही जलील यांनी दिला आहे.