सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत राज्यात भाजपच्या सहकार्याने शिंदे -फडणवीस सरकार स्थापन केले आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. शिंदे यांच्या गटातील आमदार आपल्या कार्यकर्त्यांना शिंदे गटात शामिल करून घेत आहेत.
दरम्यान काल रात्री शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेयांच्यावर निशाणा साधला. “मी संजय शिरसाट यांना विचारतो, तुम्ही मुंबईत असता, मग मतदारसंघात काय करायचं?
ते बोलले की मतदारसंघ ओके आहे. त्यामुळे आता एकदम ओके वाटतंय. तर काही आत्मपरिक्षण करायचं सोडून आम्ही कसे बंडखोर आहोत हे सांगत आहेत. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केला आहे.”, असे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही हिंदुत्वाचा झेंडा फडकवल्यावर तुम्ही कॅबिनेटमध्ये नामांतराचा निर्णय घेतला. शिवसेना वाचवण्यासाठी ही क्रांती आहे. असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. दरम्यान मध्यरात्री असा मेळावा कुणी घेऊ शकत नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.