मुंबई । जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जप्रकरण मराठा समाज आक्रमक झाला होता तसेच राज्य सरकार विरोधात मराठा समाज थेट रस्त्यावर उतरला होता. अशातच आता आंदोलकांच्या मागणीनुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे असा ठराव सर्वपक्षीय बैठकीत केला.
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला असताना यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील सर्व पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारतर्फे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केले. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब सुद्धा उपस्थित होते
सरकार व सर्व पक्ष तुमच्यासोबत आहेत, मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील आहे, कुणबी दाखल्याबाबत समितीही स्थापन केली आहे, त्यामुळे आपण सरकारला वेळ द्यावा आणि उपोषण मागे घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले, तसा ठरावही बैठकीत करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह सह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते उपस्थित होते.