लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे अशातच आता महविकास आघाडीच्या तिन्ही पक्षामध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज, बुधवारी मुंबईत बैठक होणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीत तीनही पक्षांच्या संभाव्य जागावाटपाबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक दुपारी तीन वाजता होत असल्याचे सूत्रांकडून समजते. एकीकडे महाराष्ट्रात भाजपने लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीनेसुद्धा राज्यात निवडणुकांची तयारी चालविली आहे.
तसेच भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांचेही राज्याच्या विविध जिल्ह्यात दौरे सुरू असून पक्ष मजबुतीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी स्वतंत्रपणे पक्षांतर्गत लोकसभा निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. यामुळे उद्या प्रथमच महाविकास आघाडीच्या निवडक नेत्यांची बैठक पवार यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीत संभाव्य जागावाटपाच्या मुद्द्यावरून चर्चा होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
२०१९च्या निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. तथापि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर बहुतांश खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने नवनीत राणा ह्या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. सध्या त्या भाजपसोबत आहेत. यामुळे अमरावतीच्या जागेवर राष्ट्र्रवादी काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे.