आदिल खानने फसवले असल्याचा आरोप राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वी केला. याप्रकरणी राखी सांवतने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. ती रोज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अपडेट्स देत असते. त्यातच, आता या प्रकरणात रिपब्लिकन इंडिया या पक्षानेही उडी घेतली आहे. अभिनेता आदिल खानविरोधात उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले ओशिवरा पोलीस ठाण्यात तीव्र आंदोलन छेडणार आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंतचे आदिल खानसोबत लग्न झाले होते, मात्र लग्नानंतर आदिल खानने अभिनेत्री राखी सावंतवर अत्याचार आणि घोर अन्याय केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.राखी सावंत ही रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहेत. तिचे आदिल खानसोबत लग्न झाले होते. काहीच दिवसांपूर्वी तिने याबाबत सोशल मीडियावरून खुलासा केला होता. मात्र, कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, अत्याचार आणि अन्याय होत असल्याची दावा करत याविरोधात आदिल खानवर राखी सावंतने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
आदिल खानने अत्यंत वाईट वर्तवणूक आणि कृत्य केली असल्याची माहिती राखी सावंतने वेळोवेळी दिली आहे. याविरोधात आदिल खानच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. रिपाइं चे वर्सोवा तालुका अध्यक्ष सुनिल पवार ; जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव;किशोर मासुम ; जयंती गडा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. तसेच कर्नाटकातील म्हैसूर येथे एका इराणी महिलेने आदिल खानवर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.