शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील लढ्याचा निकाल अखेर काल निवडणूक आयोगानं दिला. आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल देत त्यांच्या पक्षाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले. आयोगाच्या या ऐतिहासिक निकालानंतर तब्बल ५७ वर्षांनंतर शिवसेना पक्ष ठाकरे कुटुंबाच्या हातून गेला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर लोक आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय आल्यानंतर राजकीय क्षेत्रासह सिनेइंडस्ट्रीतून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच मराठी अभिनेता आणि बिगबॉस मराठीचा स्पर्धक राहिलेला आरोह वेलणकरने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आरोह वेलणकर नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडत असतो. आता त्याने शिवसेना नाव-धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानंतर ट्विट केले आहे. जे चर्चेत आले आहे.
आरोह वेलणकरने ट्विटरवर ट्विट केले आहे. यामध्ये त्याने लिहिले की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं अभिनंदन… बाळासाहेब पण खुश असतील आज’. त्याच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर आता संमिश्र प्रतिक्रियादेखील यायला सुरुवात झाली आहे. अभिनेता असणारा आरोह वेलणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने ‘रेगे’ या चित्रपटात काम केले आहे. नुकतेच तो बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. तो टॉप ५ मध्ये पोहोचला होता. याआधीसुद्धा आरोह वेलणकर बिग बॉस मराठीमध्ये झळकला होता. परंतु शोच्या मध्यातच तो घरातून बाहेर पडला होता