तंत्रज्ञान युगात वेगवेगळे नवीन शोध लागत असताना विशेषतः मोबाईल जगतात तर सध्या प्रचंड वेगाने क्रांती घडत असल्याचे दिसून येते.
त्यामुळेच यापुढे मोबाईल मध्ये सिम कार्ड साठी जागाच नसेल, त्याऐवजी ही सिम कार्ड मोबाईल तयार करतानाच त्यामध्ये ई सिम कार्डची सुविधा देण्यात येईल, त्यामुळे सिम कार्ड बदलण्याची गरज पडणार नाही. या संदर्भात ॲपल कंपनीने ही आगळीवेगळी घोषणा केली असून अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे. परंतु त्याचबरोबर काही तोटे ही होण्याची शक्यता आहे. अर्थात सध्या तरी ही सुविधा अमेरिकेत असून भारतात येण्यासाठी त्याला खूप वाट पाहावी लागणार आहे.
ॲपल कंपनीने आयफोनच्या १४ एडीशनची घोषणा करताना त्यातून सिम कार्ड हद्दपार केल्याचे जाहीर केले असून अमेरिकेत निर्माण केल्या जाणाऱ्या आयफोन १४मध्ये सिम कार्डसाठी जागा ठेवली नसल्याचेही सांगितले. मात्र त्याऐवजी या आयफोनमध्ये एकाच वेळी आठ ‘ई सिम’ ठेवण्याची सुविधा देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
सध्या ॲपलच्या नव्या आयफोनच्या अमेरिकेतील एडीशनमधून प्रायोगिक तत्वावर सिम कार्डची जागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामध्ये आठ ई-सिम प्रोफाइल कार्यान्वित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्या ग्राहकाला एका आयफोनवरून एकाच वेळी आठ नंबर मिळण्याची सोय असेल. परंतु एका वेळी केवळ दोनच ई-सिम त्याला सक्रिय ठेवता येतील.
यात प्रत्यक्ष सिम कार्डऐवजी डिजिटली जतन करून मोबाइल सेवा वापरण्याची सुविधा ई-सिम देते. ‘ई-सिम’ हा ‘एम्बेडेड सिम’ असा या शब्दाचा अर्थ आहे. यात बाहेरून प्लास्टिकचे सिम कार्ड बसवण्यासाठी जागा दिलेली नसते. मोबाइलच्या हार्डवेअरमध्येच सिम कार्डच्या चिपचा अंतर्भाव करण्यात आलेला असतो. कोणत्याही मोबाइल सेवापुरवठादाराची सेवा घेऊन या चिपद्वारे ई-सिम कार्यान्वित करण्यात येतो. तसेच मोबाइल सेवा बदलायची झाल्यास नवीन सिम कार्ड बसवण्याच्या ऐवजी चिप ‘रिप्रोग्राम’ करून सेवा सक्रिय करता येऊ शकते.