सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सामना अग्रलेखातून सविस्तर भूमिका स्पष्ट करण्यात आली असून शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली आहे. विधिमंडळात तुमच्याकडे बहुमत आहे याचा अर्थ तुम्ही म्हणजे पक्ष होत नाही, असे विधान न्या. चंद्रचूड यांनी केले आहे. विधिमंडळातील फक्त चाळीस आमदार म्हणजेच शिवसेना, असा निर्णय निवडणूक आयोगातील ईस्ट इंडिया कंपनीच्या एजंटांनी दिला काय आणि या विकतच्या बहुमतवाल्यांनी नाचायलाच सुरुवात केली, पण कितीही नाचकाम केले तरी सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी सुनावणी सुरू आहे व न्याय मेला नाही हे लवकरच कळेल, असे अग्रलेखात म्हटले आहे.
निकालाची पर्वा आम्हाला नाही, पण संविधान, सत्य व जनतेचा आवाज मारला जाऊ नये यासाठी हा लढा आहे ! घर म्हणजे चार भिंती नाहीत. शिवसेना म्हणजे विधिमंडळ नाही. निकाल हाच आहे, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. दिवसाढवळ्या चाळीस चोरांनी शिवसेनेवर दरोडा टाकला. चाळीस जणांची चोरांची टोळी हा ‘चोरबाजार’ होऊ शकतो, पण चोरबाजार म्हणजे शिवसेना हे कसे घडेल? चोरांना रस्त्यावर अडवून जनता जागोजागी जाब विचारीत आहे.
मिंधे गटाच्या भजनी लागलेले आमदार बच्चू कडू हे धाराशीव जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथील लोकांनी, आबालवृद्धांनी त्यांना घेरावच घातला.चोर-डाकूंसोबत तुम्ही गेलात कसे? लाजलज्जा गुंडाळून ठेवलीत काय? असा जाब विचारून लोक त्यांची गाडी अडवू लागले तेव्हा बच्चूभाईंचा आंबट चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सर्वच चाळीस आमदारांवर जागोजागी हीच वेळ आली. कारण शिवसेना जनतेत आहे, असा शब्दात ठाकरे गटाकडून शिंदे गटातील बंडखोर नेत्यांवर हल्लाबोल करण्यात आला.