सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत टीका केली. दुर्दैवाने आजच्या काळातील मुख्य निवडणूक आयुक्त तितके धाडसी दिसत नाहीत, ते कारवाई करू शकत नाही. आपल्या देशातील व्यवस्था मोडकळीस आली आहे, याचे हे उदाहरण नाही का? असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. यावरूनच आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी न्यायालयाच्या याच टीकेवरून वक्तव्य केले आहे.
राऊत म्हणाले, निवडणूक आयोग जर तटस्थ असते तर शिवसेनेच्या पक्षाचे चिन्ह गोठवले नसते, असे ते म्हणाले. ज्याप्रकारे आमच्या पक्षाच्या चिन्हाला गोठवणे हा एक राजकीय निर्णय होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. या संस्थेच्या हातात देशाच्या निवडणुका, देशाची लोकशाही असते. जर घटनात्मक संस्था गुलाम बनून काम करेल किंवा सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतल्या लोकांची नियुक्ती होईल तर देशात लोकशाही राहणार नाही, असेदेखील संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, कोणतेच निवडणूक आयुक्त हे आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही. यावरही कोर्टाने फटकारले आहे. मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो की, त्यांनी जनतेच्या आवाजाला वाचा फोडली, असेही राऊत म्हणाले. यासोबतच त्यांनी, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ४० गावे ताब्यात घेणार असल्याच्या वक्तव्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. हे मिंधे सरकार आहे, हे कमजोर सरकार आहे; परंतु आम्ही महाराष्ट्रासाठी कायम लढत राहू, असे राऊत म्हणाले.